स्वप्नपूर्तीचे समाधानस्वातंत्र्य, स्वाभिमान व स्वराज्य या बाबींना मानवी जीवनात मोलाचे स्थान आहे. म्हणून इंग्रजांनी भारतावर गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न सुरु करताच, त्यांच्याविरुध्द येथे संघर्ष सुरु झाला. या संघर्षाचा इतिहास अद्वितीय साहस करणाऱ्या शूरवीरांच्या पराक्रमाने व्याप्त आहे. चिमणा बहादूर हे अशाच एका शूरवीराचे नाव आहे. इंग्रजांनी नागपूर राज्यावर अधिपत्य प्रस्थापित केल्यामुळे इ.स. १८१८ मध्ये आप्पासाहेब भोसले यांनी पचमढीला केंद्र बनवून स्वातंत्र्य लढा उभारला. त्याच प्रसंगी चिमणा बहादूरने वैनगंगेकडील प्रदेशात स्वातंत्र्य लढा उभारुन, इंग्रजांविरुध्द युध्द केले. यावेळी इंग्रजांविरुध्द लढण्याचे असामान्य साहस करून चिमणा बहादूर यांनी “भारत हा सध्या विखंडित व निद्रावस्थेत असला, तरी त्याने सत्त्व गमावलेले नाही, त्याच्यात अजूनही प्राण शिल्लक आहे.” ही बाब इंग्रजांच्या निदर्शनात आणून दिली व भारतीय शूरवीरांच्या परंपरेत आपले नाव कोरले आहे.स्वातंत्र्योत्तर काळात पराक्रमी पूर्वजांच्या इतिहासाला उजाळा देण्याच्या कार्याला सुरुवात झाली. पण या श्रृंखलेत चिमणा बहादूरसारख्या अनेक शूरवीरांचा इतिहास दुर्लक्षितच राहिला. अलीकडे काही वर्षापूर्वी घनश्याम मेहता, मोरगाव अर्जुनी यांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्यांच्या इतिहासाला समोर आणण्याच्या दिशेने थोडेफार कार्य केले. नंतर डॉ. प्रभाकर गद्रे (डी.लिट्.), आमगाव यांनी देखील कामठा जमीनदारी व चिमणा बहादूर संबंधी लेखन केले. पण हे सर्व प्रयत्न जुजबी स्वरुपाचे होते. डॉ. गद्रे यांच्या हाताशी संशोधनात्मक अनेक विषय आहेत. त्यामुळे ते या विषयाच्या संशोधनाकडे लक्ष केंद्रित करु शकले नाही, याची आम्हाला जाणीव आहे. तथापि, हे सर्व घडत असतांना, “स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करणाऱ्या चिमणा बहादूरसारख्या शौर्यशाली व्यक्तीचा इतिहास समर्थपणे समाजासमोर मांडणे, ही इतिहासाचे अभ्यासक या नात्याने आपली नैतिक जबाबदारी आहे”, ही बाब प्राचार्य ओ.सी. पटले यांनी ओळखली व या विषयात संशोधन करण्याचे मानस बनविले. त्यांनी अत्यंत कष्टाने, कामठा परगण्याच्या इतिहासविषयक दस्तऐवजांचा शोध घेत त्यांचा आणि समकालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेल्या बाबींचा तुलनात्मक व चिकित्सकपणे अभ्यास करुन, तर्कशुध्दपद्धतीने खंडन-मंडन करीत विषयाची मांडणी करुन मध्ययुगीन परगणे कामठा व चिमणा बहादूरचा खरा इतिहास उजेडात आणलेला आहे. त्यातून, सरांचा संशोधनविषयक प्रदीर्घ अनुभव प्रभावीपणे झळकतो. त्यांनी आपले उभे आयुष्य शिक्षण, महाकवी भवभूति आणि भवभूतींचे जन्मस्थान पद्मपूर याविषयीच्या संशोधनात घालविले असून त्यांचे संशोधनात्मक लेख, प्राचीन तीर्थ जीर्णोध्दार (मासिक पत्रिका, जैन महासभा, लखनौ), जैन बालादर्श (मासिक पत्रिका, अलाहाबाद), अमर जगत् (साप्ताहिक, आगरा), शिक्षण संक्रमण (मासिक, पुणे), शिक्षण समीक्षा (त्रैमासिक, नागपूर) आणि नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होत आलेले आहेत. त्यांच्या या तपश्येचा तेज चिमणा बहादूरसंबंधीच्या या ग्रंथात जागोजागी जाणवतो.
प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी प्राचार्य ओ.सी. पटले यांनी सातत्याने सहा वर्षे संशोधन, चिंतन व मनन केले. त्यांनी या कालावधीत इतिहासाचे विपुल जमा केले. चिमणा बहादूरच्या घराण्यातील आणि त्यांच्या कर्मभूमीच्या परिसरातील अनेक प्रबुध्द लोकांच्या व सामान्य व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. संबंधित अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. अनेक मान्यवर अभ्यासक आणि इतिहास संशोधकांशी याविषयी चर्चा केली. अंततः त्यांच्या स्वयंप्रज्ञेतून व अथक परिश्रमातून या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. ग्रंथ निर्मितीचे श्रेय सर्वस्वी त्यांनाच आहे. त्यांच्या या सर्व प्रयत्नांचा मी साक्षी असून, या निमित्ताने त्यांच्यासोबत घडलेला प्रवास हा माझ्या जीवनातील एक विलक्षण अनुभव होता. वीर राजे चिमणा बहादूर फाऊंडेशनने इ.स. २००७ पासून या वीर पुरुषाची जयंती व बलिदान दिन संपन्न करणे प्रारंभ केले आहे. त्यावेळेपासूनच या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चिमणा बहादूरवरील ग्रंथ साकार व्हावे, असे स्वप्न पाहिले होते. आदरणीय श्री. ओ.सी. पटले यांच्या अदम्य इच्छाशक्तीतून हे स्वप्न आज या महान ग्रंथाच्या स्वरुपात साकारले आहे.
या सुमारे दोनशे पानांच्या ग्रंथामध्ये इ.स. १८१८ च्या स्वातंत्र्य लढ्याचे समग्र चित्र आणि चरित्र स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, यात चिमणा बहादूर यांच्या जीवनाचा संपूर्ण आलेख मांडण्यात आलेला आहे. शिवाय, परगणे कामठ्याचे संस्थापक कोलुबापू आणि मराठाकालीन सुप्रसिध्द जमीनदार गोंदिबापू यांच्या समग्र कार्याचा, आणि अनेक बारकावे मांडत बहेकार राजवंशाचा परिपूर्ण इतिहास या ग्रंथातून समोर आणला आहे. बालाघाट व भंडारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये उपलब्ध असलेला त्यांचा त्रोटक इतिहास वाचून, मनामध्ये त्याविषयी अतृप्तीचा भाव उत्पन्न होत असे. लिखीत स्वरुपातील वर्णन आणि मौखिक स्वरुपात उपलब्ध माहिती यात तारतम्य जाणवत नसल्यामुळे मन क्षुधाक्रांत होत असे आणि ते एका अनाकलनीय असंतोषाने व्यापून जात असे. मनाच्या अशा विषन्न अवस्थेत, जिज्ञासापूर्तीसाठी तळमळ उत्पन्न होत असे. प्रस्तुत ग्रंथ हे दर्जेदार, राष्ट्राचा अभिमान निर्माण करणारे आणि चिमणा बहादूरच्या इतिहासाविषयी मनात उत्पन्न होणाऱ्या जिज्ञासेचे पूर्ण समाधान करणारे असून, गमावलेली अमूल्य संपदा पुन्हा गवसल्यासारखी संतुष्टी देणारे आहे. समाजापासून हरपलेला एक अभिमानास्पद वारसा या ग्रंथाने आज सर्वांना मिळवून दिलेला आहे. हे ग्रंथ निश्चितपणे गौरवास्पद आहे, याचा याठिकाणी मी आवर्जून उल्लेख करीत आहे. तद्वतच, या विषयावर आणखी संशोधन करण्यासाठी पुढे कोणी प्रयत्न केले तर आमची संस्था त्यांचे स्वागत करेल हेही मी या ठिकाणी विनम्रपणे नमूद करीत आहे.
विजय बाहेकर
संयोजक
वीर राजे चिमणा बहादूर फाऊंडेशन, गोंदिया
अध्यक्ष
श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था, गोंदिया